एमपीएससी राज्यसेवा 2022 परीक्षेत विनायक पाटील यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे तर मुलींमध्ये पुजा वंजारी (Pooja Vanjari MPSC Topper) यांनी प्रथम येण्याची बाजी मारली आहे. एकूण 613 जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. एमपीएससी मध्ये मुलींच्या यशाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढताना दिसत आहे. मात्र पुजा वंजारी यांचे हे यश निश्चितच वेगळं आहे याचं कारण म्हणजे लग्न झाल्यानंतर घरातली जबाबदारी सांभाळून नोकरी सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. जाणून घेऊयात पूजा वंजारी यांच्या यशाची प्रेरणादायी कहाणी.
पुजा वंजारी यांचे गाव आणि शिक्षण
पुजा यांचे गाव सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील बोरगाव आहे. पुजा यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला असून वडील शेतकरी तर आई गृहिणी आहेत. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण बोरगाव येथूनच झालेले आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी इस्लामपूर येथे राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे कॉम्प्युटर सायन्स मध्ये इंजीनियरिंग ची डिग्री घेतलेली आहे.
कौटुंबिक पार्श्वभूमी
पुजा एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मुलगी आहे आणि वडील शेती करतात. त्यांचे एक काका शेती करतात आणि दोन काका कन्स्ट्रक्शन बिजनेस मध्ये आहेत. घरामध्ये आधीपासूनच शैक्षणिक पार्श्वभूमी होती आणि सर्वांनीच घरात शिक्षणाला महत्व दिलं होतं आणि यामुळेच पुजाला वाटतं की या मिळालेल्या यशामध्ये त्यांच्या घरच्यांचा खूप मोठा वाटा आहे. एक शैक्षणिक पार्श्वभूमी असल्यामुळे हे यश साध्य झालेल आहे असं त्या आवर्जून सांगतात.
एमपीएससी च्या तयारीला कधी सुरुवात केली?
2015 मध्ये इंजीनियरिंग करत असताना पूजा यांनी ठरवलं की एमपीएससी कडे वळावे. खरंतर माझ्यासारखे शिक्षण झालेल्या मुली प्रायव्हेट जॉब कडे करिअर म्हणून बघतात. पण मी ठरवलं की स्पर्धा परीक्षेकडे जावे आणि माझ्या त्या कॅपॅबिलिटीच असल्यामुळे एक अधिकारी होण्याचा मी निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेची तयारी चालू करत असताना मला परीक्षेबद्दल काही माहिती नव्हती. ज्यावेळी मी पदांची माहिती घेतली त्यावेळेस मी ठरवलं की आपण उपजिल्हाधिकारी बनायचंच.
स्पर्धा परीक्षेची तयारी कशी केली?
या परीक्षेमध्ये असं म्हटलं जातं की यशापेक्षा आपल्याला अपयश जास्त बघाव लागत आणि ते माझ्या बाबतीतही तितकच खरं ठरलेल आहे. 2020 मध्ये माझी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था या पदी निवड झालेली होती पण त्याच्या आधी अनेकदा अपयश आलं आणि असं होतं की कोविडच्या काळामध्ये खूप वेळा एक्झाम पुढे ढकलल्या गेल्या. तर तो एक कठीण काळ होता आणि माझ्या घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळे मी बाहेर पडू शकले माझी जी भावंड आहेत माझा भाऊ यूपीएससीची तयारी करतोय माझी बहीण देखील 2021 मध्ये सीओ म्हणून निवड झालेली आहे माझा भाऊ म्हणजे काकांचा मुलगा तो देखील इरिगेशन मध्ये आहे. तर एक पॉझिटिव्ह वातावरण घरात कायम राहिलं आणि त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या गोष्टी खूपच मॅटर करतात आणि आज जे यश मिळालं आहे त्यामध्ये सर्वांचाच खूप मोठा वाटा आहे.
रोज किती तास अभ्यास केला?
नोकरी आणि घर सांभाळत जसा मला वेळ मिळेल तसा मी अभ्यास सतत चालू ठेवला होता आणि रोज मी आठ तास तरी अभ्यासासाठी काढत होते. असं घर आणि अभ्यास असं दोन्ही देखील मी मॅनेज केलं आणि अभ्यास चांगल्या प्रकारे केला.
अभ्यास करतांना नेमकं शेड्युल कसं होतं?
मला वाटतं की आपण अभ्यास किती करतो त्यापेक्षा आपण कसा (एफेक्टिव्ह) करतोय हे जास्त महत्त्वाचा आहे. कारण मी कधीच सोळा-सतरा अभ्यास केलेला नाही. खरं सांगायचं झालं तर मी माझा अभ्यास आठ ते नऊ तास केलेला आहे. अभ्यासाची दिशा योग्य असेल तर यश निच्छीतच मिळाल्याशिवाय राहत नाही.
लग्नानंतर सासरच्या मंडळींचे मिळाले पाठबळ
मला वाटतं की लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या मनामध्ये एक भीती असते की आपण जे क्षेत्र निवडले आहे त्यात सासरच्या मंडळींचा पाठिंबा राहील की नाही. पण मला वाटतं की जस मला माझ्या माहेरच्या मंडळींनी सपोर्ट दिला तसं माझ्या सासरच्या मंडळींनीही खुप सपोर्ट दिला. माझ्या जाऊ बाई असतील, सासुबाई असतील, माझे दिर, माझे मिस्टर यांनी यामध्ये मला कधी अभ्यासासाठी बाकीच्या गोष्टीत लक्ष घालू दिल नाही. सगळ्यांनी घरातील गोष्टींसाठी अभ्यासामध्ये तडजोड करू दिली नाही.
या सगळ्या यशात पतीचे मोलाचे सहकार्य लाभले
लग्न ठरल्यापासून माझ्या पतीचा मला कायम पाठिंबा होता की तू अभ्यास कर बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. ते नेहमी सांगायचे की एक वेळ घरात तू स्वयंपाक नाही केलास तरी चालेल पण तू अभ्यास चुकवायचा नाही. मला वाटतं की माझ्यासाठी देखील त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक कॉम्प्रमाईज केलेले आहेत.
मुलाखतीच्या वेळेस विचारले गेलेले अवघड प्रश्न
मला वाचनाची आवड आहे आणि त्यात पण आंतरराष्ट्रीय गोष्टी मी जास्त वाचलेल्या आहेत. तर याच विषयांवर मला सरांनी प्रश्न विचारले आणि ते खूप इंटरेस्टिंग होते. मी डीवायएसपी ऑप्शन माझ्या प्रेफरन्स मध्ये दिल्यामुळे मला नक्षलवादावरती थोडे प्रश्न विचारले. ते प्रश्न थोडे आव्हानात्मक वाटले होते. पण मला वाटतं मी चांगल्या प्रकारे मुलाखतीला समोरी गेली. त्यामुळे मला 60 मार्क्स आले आणि रिझल्ट मध्ये त्या मुलाखतीच्या मार्कांचा खूप मोलाचा वाटा आहे. मला वाटत मी मुलाखतीचा चांगल्या प्रकारे सकारात्मक दृष्टीकोनाने सामना केला.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल
अभ्यासात सातत्य ठेवा आणि त्या सातत्यामध्ये पण अभ्यासाला एक योग्य दिशा ठेवा या दोन गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटतात. अपयश आल्यानंतर आपल्या चुका काय झाल्या आणि त्या चुका का होतात ते पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. अनेकदा असं होतं की आपण सतत अभ्यास करत राहतो पण आपण कुठे चुकतोय याचा विश्लेषण आपण करत नाही. तर ते बघितलं पाहिजे आणि एक दिवस अभ्यास केला दुसऱ्या दिवशी नाही केला असं करून चालत नाही. एमपीएससीची तयारी करताना अभ्यासात एक सातत्य ठेवावं लागतं आणि फक्त सातत्यच नाही तर त्याला एक योग्य दिशेची जोड असली पाहिजे. या सगळ्यांचा जर मेळ साधला आणि तुमच्यात जर क्षमता असेल तर याचे फळ एक दिवस नक्कीच मिळणार.
एमपीएससी चा अभ्यास किती तास केला पाहिजे?
एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना आपण किती अभ्यास करतोय यापेक्षा आपण कसा अभ्यास करतोय हे जास्त महत्वाचं असत. आपल्या अभ्यासात जर सातत्य असेल तर रोज ८ ते ९ तास अभ्यास देखील पुरेसा आहे. अभ्यासाला एक योग्य दिशा असणे जास्त महत्वाचे आहे.