गिधाड हे निसर्गातील स्वच्छता दूत म्हणून मानले जातात. बदललेल्या निसर्गचक्रामुळे गिधाडांची संख्या कमी होत आहे तसेच काही जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. गिधाडांच्या संवर्धनासाठी वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यातील दहा वर्षाच्या करारानुसार पुण्याजवळ ६० किलोमीटर अंतरावर असलेल्या जेजुरी जवळील पिंगोरी गावात महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारण्यात येणार आहे. या केंद्राची उभारणी येत्या वर्षभरात अपेक्षित आहे. महाराष्ट्रात आढळणाऱ्या बेंगालेन्सिस आणि गिप्स इंडिकस या दोन प्रजातींचे प्रामुख्याने संवर्धन करण्यात येणार आहे.
दोन सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन म्हणून पाळला जातो. देशातील गिधाडांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने कृती आराखडा तयार केला आहे. तुझ्या आराखड्याच्या अंतर्गत देशातील वेगवेगळ्या भागात गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारली जात आहेत. जेजुरी जवळील पिंगोरी गावात इला फाउंडेशनचे विलू सी. पूनावला वन्य प्राणी उपचार केंद्र आहे. इला फाउंडेशनचे संचालक प्रसिद्ध पक्षी तज्ञ डॉक्टर सतीश पांडे असून या केंद्रामध्ये गिधाड संवर्धन केंद्र उभारण्यात येणार आहे.
गिधाडे निसर्गातील सेंद्रिय कचरा आणि मृतदेह साफ करण्यासोबत परिसंस्था स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. ज्या भागात गिधाडे नाहीत त्या भागामध्ये मृतदेह किंवा सेंद्रिय कचरा नैसर्गिक दृष्ट्या कुजण्यास अधिक कालावधी म्हणजे तीन ते चार पट जास्तीचा वेळ लागतो. पर्यावरणावर होणाऱ्या परिणामामुळे मागील २० वर्षांपासून गिधाडांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी संरक्षित जागेत त नैसर्गिक अधिवासासारखी स्थिती तयार करून त्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.
महाराष्ट्र वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यात गिधाडांच्या संवर्धनासाठी दहा वर्षाचा करार करण्यात आला आहे. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहित गुप्ता, मुख्य वनसंरक्षक प्रवीण एन. आर. आणि इला फाउंडेशन च्या वतीने डॉक्टर सतीश पांडे तसेच डॉक्टर सतीश करमळकर हे केंद्राच्या मुख्य जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत. उत्तर प्रदेशातील महाराज गंज जिल्ह्यामध्ये जगातील पहिले गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारण्यात आले आहे.
देशातील गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र
- जटायू संवर्धन प्रजनन केंद्र, पिंजोर, हरियाणा
- गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, राजाभटखवा, पश्चिम बंगाल
- गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, राणी, आसाम
- गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, भोपाळ, मध्य प्रदेश
- गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, महाराजगंज, उत्तर प्रदेश
- गिधाड संवर्धन प्रजनन केंद्र, पिंगोरी, महाराष्ट्र
गिधाड संवर्धनासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न
सन २०११ नाशिक वन विभागाच्या वतीने त्रंबकेश्वर मधील मौजे खोरी पाडा वनक्षेत्रात पहिला गिधाड उपहारगृहाचा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे तेथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीला २०१४ च्या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अलीकडेच पुणे वनविभागाच्या वतीने मावळ तालुक्यात गिधाड उपहारगृह उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठे आहे?
जेजुरी जवळ पिंगोरी येथे महाराष्ट्रातील पहिले गिधाड संवर्धन आणि प्रजनन केंद्र उभारले जाणार आहे.
भारतात गिधाडांच्या किती जाती आढळतात?
भारतात गिधाडांच्या नऊ जाती आढळतात.
महाराष्ट्रात आढळणाऱ्या गिधाडांच्या जाती कोणत्या?
महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद झाली आहे. त्यातील प्रामुख्याने आढळणाऱ्या जाती म्हणजे- भारतीय, पांढर्या पुठ्ठ्याची, लांब चोचीची, हिमालयीन ग्रिफॉन आणि पांढरी गिधाडे.